औरंगाबाद - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर शहरात पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून घरीच राहण्याचा सल्ला दिला.
औरंगाबाद शहरात संचारबंदीचे आदेश मिळाल्यापासून प्रत्येक मुख्य रस्त्यावर पोलीस सेवा देत आहेत. या कालावधीत अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवार पासूनच बाजार पेठ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादमध्ये जवळपास 80 टक्के व्यवहार बंद करण्यात आले. जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रविवारी रात्री अनेक नागरिक घराच्या बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
हेही वाचा - COVID-19 LIVE : बुधवारपासून आंतरराज्यीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय..
सोमवारपासून कलम 144 लागल्यानंतर जमावबंदी असताना देखील अनेक लोक रस्त्यावर आल्याच दिसून आले. म्हणून संचारबंदी लावल्यानंतर पोलिसांनी आता नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून प्रत्येकाला घरी जाण्याचा सल्ला पोलीस देत आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच बाहेर पडण्याच्या सूचना सोमवारी देण्यात येत आहेत. मध्यरात्रीपासून संचारबंदीची सक्त अंमलबजावणी केली जाणार आहे. इतकेच नाही तर नियम मोडणाऱ्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.