औरंगाबाद - स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकाला पालकांनी चोप दिल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील ही घटना असून मुख्याध्याकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शाळेचा मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे हा मागील काही दिवसापासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करीत होता. या प्रकाराविषयी मुलींनी काही पालकांना कल्पना दिली होती. परंतु, मुलींचा गैरसमज झाला असावा असे समजून पालकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु, मागील पंधरा दिवसापासून चौथीच्या वर्गातील एक मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. सदरील मुलगी कायम भीतीच्या वातावरणात राहत असल्याचे लक्षात आल्याने तिला तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन बोलके केले, तेव्हा शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा हा भयंकर प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराविषयी अधिक माहिती घेतली असता या घृणास्पद प्रकाराला ही मुलगी एकटीच बळी पडली नसून अजून अनेक मुली असा त्रास सहन करीत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. या प्रकाराला बळी पडलेल्या तीन मुलींनी धाडस करून समोर येत हा सर्व प्रकार कथन केला. यावेळी संतप्त नागरिक, महिला व पालकांनी मुख्याध्यापकास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पहाटे शाळेतच चांगला चोप दिला. शाळेत तणावपुर्ण परीस्थिती निर्माण होताच पोलीस पाटील निलेश बलसाने आणि इतर काही नागरिकांनी काकळे यास एका वर्गखोलीत बंद करून मारहाणीचा आणि पुढील अनुचित प्रकार रोखला.
पोलीस पाटील बलसाने यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुख्याध्यापकास ताब्यात घेतले. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक काकळे याच्याविरुद्ध कलम 354,354 (अ) (1) भादवि सह कलम 8, 10 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलील निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम.आहेर करीत आहेत.