औरंगाबाद - वैजापूर तालुक्यात लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आप्पा मधुकर माकोडे (२५, रा. डागपिंपळगाव) असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याच शोध घेत आहेत.
पीडितेचे १४ मे रोजी शेजारील गावातील तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. हा विवाह समारंभ संपून हळद उतरविण्यासाठी ती १६ मे रोजी माहेरी परत आली. त्यादिवशी घरात धार्मिक विधी करुन सर्वजण झोपले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास माकोडे या आरोपीने तिला फोन केला. तू माझ्यासोबत बोलण्यासाठी घरा बाहेर ये, नाहीतर झोपलेल्या तुझ्या आई-वडिलांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. यानंतर पीडिता माकोडेशी बोलण्यासाठी घराबाहेर आली. चल आपल्याला महत्वाचे बोलायचे असे म्हणत त्याने पीडितेला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने गाडीवर बसण्यास विरोध केला. मात्र, माकोडेने बळजबरी करत फरपटत तिला आपल्या गाडीवर बसवून येवल्याच्या दिशेने नेले. यानंतर त्याने आपली दुचाकी येवल्याच्या नजीक रस्त्याच्या कडेला आडरानात थांबवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच स्थितीत आरोपीने रंजनाला येवल्याच्या जवळ सोडून पोबारा केला.
घटनेनंतर पीडितेने स्वतःला सावरत येवला पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत पीडिताच्या आई-वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. नातेवाईकांनी रंजनाला घेऊन विरगाव पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांच्याकडे तपास दिला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
"नराधमास कडक शासन व्हावे"
माझ्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या जीवनात असा दुर्दैवी प्रसंग घडला. माझी अब्रू लुटणाऱ्या नराधमास कडक शासन व्हावे, अशी मागणी पीडितीने केली आहे.