औरंगाबाद - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका खुनातील आरोपीने तीस वर्षीय महिलेचे तिच्या मुलीसह अपहरण केले. तो त्यांना निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे महिलेसोबत तो अतिप्रसंग करणारच त्याचवेळी महिलेने शक्कल लढवली आणि मला एड्स आहे, असे सांगितले. हे ऐकताच आरोपीने तेथेच महिला व मुलींना सोडून पळ काढला.
तीस वर्षीय विधवा महिला तिच्या सात वर्षांच्या मुलीसह उस्मानपुरा भागात उभी होती. त्याच दरम्यान आरोपी किशोर विलास आव्हाड दुचाकीवरून तेथे आला. मी तुम्हाला घराकडे सोडतो, अशी थाप त्याने संबंधित महिलेला मारली. जवळ पैसे नसल्याने आणि वेळेवर घरी पोहोचायचे असल्याने महिलेनेदेखील होकार दिला आणि दुचाकीवर चिमुकलीला घेऊन बसली. मात्र आरोपी किशोरने त्यांना निर्जनस्थळी एका नाल्याजवळ नेले आणि तेथे चाकूचा धाक दाखवत महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
आता आपले काही खरे नाही, आपण विरोध केला तर आपल्या मुलीच्याही जीवाचा धोका होऊ शकतो याची कल्पना संबंधित महिलेला आली. यानंतर तिने तुम्हाला काय करायचे ते करा, मात्र मला एड्स आहे, असे नराधमाला सांगितले. हे एकताच त्या नराधमाने या दोन्ही माय-लेकीला सोडून तेथून पळ काढला.
आरोपी किशोरवर 2016 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी किशोरला अटक केली असून याप्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.