औरंगाबाद - वामन हरी पेठे ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपये किमतीच्या सुवर्णालंकाराची हेराफेरी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफ दुकान मालकाला विशेष तपास पथकाने अटक केली आहे. राजेश ऊर्फ राजू सेठिया असे सराफ दुकाण मालकाचे नाव असून सुवर्ण अलंकार हेराफेरी प्रकरणातील ही चौथी अटक आहे.
सेठिया याचे सराफ्यात जडगाववाला ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. आरोपी राजेंद्र जैन याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने काही किलो सोन्याचे दागिने जडगाववाला ज्वेलरसचा मालक राजेश सेठिया याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजेश सेठिया याला ताब्यात घेतले.
आर्थिक गुन्हे शाखेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत सेठिया याची चौकशी केली. सेठिया याने राजेंद्र जैन कडून 22 हजार रुपये प्रति तोळा याप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुमारे तीस किलो दागिने सेठिया याला दिल्याचे राजेंद्र जैनने पोलिसांना सांगितले.
आपण राजेंद्र जैनकडून दागिने खरेदी केले नसल्याचे सेठिया पोलिसांना सांगत होता. मात्र, पोलिसांनी सेठिया याला संशयावरुन अटक केली आहे.