औरंगाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रशासन विरोधात बैठक घेतली होती. भाजपा पदाधिकाऱ्यांनी 'आमचे शहर वाचवा' अशी हाक दिली. तर मनसेने त्यांच्या राडा स्टाईलमध्ये उपायुक्तांवर खुर्ची उगारत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
औरंगाबाद कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रोज शंभर नवे रुग्ण वाढत होते, आता हे प्रमाण दोनशेवर गेले आहे. दिवसाला सरासरी पाच रुग्णांचा मृत्यू होत आहे. या स्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात रोष समोर येऊ लागला आहे.
1 जून रोजी औरंगाबादमधील रुग्णसंख्या 1 हजार 559 होती तर मृतांची संख्या 72 इतकी होती. तीच रुग्णसंख्या 26 दिवसांमध्ये 4 हजार 460 पर्यंत पोहचली असून मृतांची संख्या 232 इतकी झाली आहे. म्हणजेच गेल्या २६ दिवसांमध्ये जवळपास तीन हजार नवे रुग्ण आढळले व 160 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्व नियम व अटी लावण्यात आल्या असताना रुग्णसंख्या वाढलीच कशी, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आता लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.
जिल्ह्यातील दोन खासदार आणि पाच आमदारांनी एकत्र येत प्रशासकीय यंत्रणेवर खापर फोडत बैठक घेतली. या बैठकीत निर्णायक असे काहीच झाले नाही. तर दुसरीकडे, भाजपा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना घेरण्याचा प्रयत्न केला. 'आमचे शहर वाचवा' अशी हाक त्यांनी दिली. मात्र, पालकमंत्र्यांनी शांत आणि संयमी भूमिका मांडत पदाधिकाऱ्यांना शांत केले. मनसेने मात्र, आक्रमक होत महानगरपालिका कार्यालयात आंदोलन केले. पालिका उपायुक्तांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी त्यांच्यावर खुर्ची उगारात आपला रोष व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून शहरात प्रशासकीय यंत्रणेवरील रोष आता वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.