औरंगाबाद - कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीत रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रक्तदानाने साजरी करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठाण कन्नड व जिजामाता शिक्षणप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून एकूण 103 जणांनी रक्तदान केले.
या शिबिरास तहसीलदार संजय वरकड यांनी भेट दिली. कन्नड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सुद्धा भेट देत शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी रक्तदान करुन या उपक्रमाचे कौतुक केले.
रक्तदान शिबिरासाठी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव सागर जाधव व सह्याद्री प्रतिष्ठाण कन्नडचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील यांनी पुढाकार घेतला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पवन गिरी, करणसिंग राठोड, जगदीश कंचार, प्रविण दाभाडे, अमोल घुगे आदींसह दुर्गसेवकांनी योगदान दिले.