औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरी नदी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. नेहमी पाण्याने ओसंडून वाहणारी नदी कोरडी पडल्याने दशक्रिया विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांना चक्क पाणी विकत घेऊन विधी पार पाडावा लागत आहे. जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा संपल्याने पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण काशी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेली पैठण येथील गोदावरी नदी या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळ आणि जायकवाडी धरणातील पाण्याच्या अभावाने कोरडी पडली आहे. नेहमी पाण्याने भरलेल्या पैठण येथील मोक्षघाट येथे दशक्रिया विधी करण्यासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक दाखल होत असतात. मात्र, हाच मोक्ष घाट आता कोरडा पडला आहे. नगरपालिकेकडून या ठिकाणी भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने येणाऱ्या भाविकांना विधी पार पाडण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते. तर याच नदीमध्ये झिरे (खड्डे) करून गावकरी हंडा व बादलीच्या साहाय्याने पाणी विकत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून झालेले कमी पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी शून्यावर आली आहे. सध्या मृतसाठ्यातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पहिल्यांदाच भाविकांना पाणी विकत घेऊन दशक्रिया विधी पार पाडावा लागत आहे. या नदीच्या पावित्र्यामुळे रोज हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. प्रशासनाने भाविकासाठी मोक्षघाट येथे पाण्याची मुबलक व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांनी केली आहे.