औरंगाबाद - पुंडलीकनगर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभावरून उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन-3, एन-4 भागाला पाणी पुरवठा करण्यास शेकडो नागरिकांनी विरोध दर्शवत जलकुंभावर मोर्चा काढला. पुंडलीकनगरचे पाणी पळविण्याचे राजकारण करण्यात आले तर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला.
पुंडलीकनगर भागात असलेल्या जलकुंभावरून सध्या पुंडलीकनगर आणि आजूबाजूच्या काही भागांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने या जलकुंभावरून एन-3 आणि एन-4 भागासाठी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. मात्र, ही पाईपलाईन टाकण्यास नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. आज शेकडो नागरिक जळकुंभाजवळ जमा झाले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही नागरिकांचा विरोध कायम असून जलकुंभातून पाण्याचा थेंबही जाऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने प्रशासन अडचणीत सापडले आहे.