औरंगाबाद - पाणीपुरी म्हणलं की अनेकांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मात्र कोरोनामुळे आपल्या आवडीची पाणीपुरीची चव चाखणे देखील अवघड झाले आहे. पाणीपुरी खावी तर आपल्याला कोरोना तर होणार नाही ना? अशी भीती वाटत असल्याने अनेकांना हवीहवीशी वाटणारी पाणीपुरी खाणं टाळत आहेत. मात्र यावर औरंगाबादच्या पितळे बंधूनी भन्नाट शक्कल लढवत पाणीपुरीचे मशीन तयार केले. या मशीनमुळे कोणाचेही हात न लागता सुरक्षितपणे पाणीपुरी खाता येत आहे.
पाणीपुरी म्हणलं, की आपोआप जिभेवर तिची चव रेंगाळायला सुरुवात होते. कधी चटपटीत, तर कधी डोळ्यात पाणी आणणारे तिखट पाणी अशी पाणीपुरी खाणे जणू अनेकांच्या सवयीचा भाग. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून बहुतांश पाणीपुरी प्रेमींनी चक्क तिच्याशी काडीमोडच घेतला आहे. कोरोनामुळे लाडक्या पाणीपुरीचा जणू द्वेष अनेक जण करू लागले. पाणीपुरी खाताना ती देणाऱ्या भैय्याचे हात वारंवार पाण्यात जातात. त्याच हाताने उष्ट्या प्लेट उचलून पाण्यात धुतात. त्यामुळे अनेक जण आधीच पाणीपुरी खाणे टाळत होते. ज्यांना पाणीपुरी आवडते ते या गोष्टींकडे कानाडोळा करून ताव मारल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, कोरोनामुळे या खवैय्यांनी देखील पाणीपुरी खाणे सोडले. त्यावर पितळे बंधूनी कायमस्वरूपी उपाय शोधून काढलाय. पाणीपुरी प्रेमींसाठी या बंधूनी चक्क पाणीपुरीचं मशीन तयार केलं आहे!
या मशीनमध्ये तीन बाजूंनी कोणाचाही स्पर्श न होता आपल्याला आपली आवडीची पाणीपुरी खाता येते. मशीनच्या प्रत्येक बाजूला सेन्सर लावण्यात आले आहेत. त्या सेन्सरच्या माध्यमातून पाच वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी खाता येते. आपल्या हवी असलेली चव निवडायची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या पाईप जवळ पुरी नेली की आपोआप त्यात पाणी पडते, आणि आपण आपली आवडीची पाणीपुरी खाऊ शकतो. त्यामुळे पाणीपुरी प्रेमी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली देखील आवडीचा पदार्थ त्याच आनंदाने पाणीपुरी खाऊ शकतात.
समीर पितळे आणि प्रतिक पितळे या बंधूनी हे 'पाणीपुरी मशीन' तयार केले आहे. समीर मेकॅनिकल इंजिनियर तर प्रतिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. समीरला पाणीपुरी खूप आवडते. कंपनीत कामावरून परत येताना समीर रोज पाणीपुरी खायचा. एक दिवस तो आजारी पडला. अनेक उपचार केले मात्र प्रकृतीत सुधात होत नव्हती. त्यावेळी पाणीपुरीमुळे हा त्रास होत असल्याचे त्याला कळाले. त्यात कोरोनामुळे पाणीपुरी खाताना भीती आणखी वाढली. त्यावेळी पाणीपुरी खाताना आरोग्य चांगले राहावे यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्यावर समीरने प्रतिक सोबत चर्चा केली आणि त्याबाबत कामही सुरू केले. त्यामुळे अनलॉक झाल्यावर पितळे बंधूनी पाणीपुरीचे मशीन सुरू केले. या एटीएममुळे कोणाचाही स्पर्श न होता पाणीपुरी खाणे खवैय्यांना शक्य झाले आहे. हे एटीएम तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला असून जवळपास 60 हजारांचा खर्च लागला आहे. या मशीनची माहिती मिळताच काही जणांनी मशीन तयार करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती प्रतीक पितळे यांनी दिली.
हेही वाचा : प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार साकारणार 'अटल' मूर्ती; शिमल्यात होणार प्रतिष्ठापना