औरंगाबाद - मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर यांचे रविवारी दि.२८ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने औरंगाबादमध्ये निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी संगीत क्षेत्रात आपले योगदान दिले.
नाथरावांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३५ साली नांदेडमध्ये झाला. त्यांनी डाॅ.आण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे बालपणापूसन गायनाचे धडे घेतले. त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी काम केले. १९५८ ला त्यांनी अनंत संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून देखील काम पाहिले. त्यानंतर कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमीत त्यांची गुरूपदी नियुक्ती करण्यात आली.
विवि पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानीत
त्यांना देशभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. पं. नेरलकर यांना मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला. यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.