औरंगाबाद - जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूमुळे पैठणमधील नाथ षष्ठी यात्रा महोत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले. दुसरीकडे 8-15 दिवस आधी निघालेल्या दिंड्या व व्यापारी पैठणला तर पोहोचले. मात्र, या निर्णयामुळे त्यांना आल्या पावली परत जायची वेळ आली आहे.
पैठण येथील नाथ षष्ठी यात्रा महोत्सवाला चारशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, 'कोरोना' या जागतिक साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी ही यात्रा स्थगित करण्याची निर्णय घेतला. यात्रेला विविध ठिकाणांहून दिंड्या येतात. चाळीस वर्षांहून अधिक वर्षांची पायी वारी परंपरा असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मंडपगाव येथील दिंडीवर या स्थगितीच्या निर्णयाने दुःखच कोसळले. गेल्या पंधरा दिवसांपासून पायीवारी करत पैठणला पोहोचलेल्या या दिंडीसह त्याचे नेतृत्व करणाऱ्या शालिग्राम देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा - मुंबई, पुणेसह नागपुरातही आढळले नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर..
कोणतीही पूर्वकल्पना न मिळता त्या वर्षाची एकनाथ महाराजांची शिष्टी ही रद्द झाल्याने अनेक व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांनी पैठणला दाखल होऊन आपले दुकान मांडायला सुरुवातही केली होती. मात्र, मंगळवारी अचानक जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले. यानंतर सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि आलेल्या व्यापाऱ्यांना परत जायचे आदेश दिले. यानंतर व्यापारीही परत निघाले.