औरंगाबाद - औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंग काम करणाऱ्या कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या; औरंगाबादमध्ये खळबळ
भावसिंगपुरा येथील २८ वर्षीय सोहन जगदीश लांडगे हे रंगकाम करतात. मंगळवारी नेहमी प्रमाणे ते सकाळीच कामावर गेले होते. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यालगत असलेल्या रवी सोनवणे यांच्या इमारतीचे रंगकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे रंगकाम करावयाचे असल्याने तो दोरीच्या झुल्यावर काम करत होता. सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक तोल जाऊन तो पडला. ही घटना घडताच बघ्यांची गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ लांडगे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ८ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्यासाठी सैनिकाचा अनोखा प्रण.. तीन वर्षांनी दाढीला लावला वस्तरा
त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्याचा वाढदिवस होता. हा आनंद मावळत नाही तोच त्याच्या जाण्याची माहिती मिळाली. त्यांच्यामुळे नातेवाईकांसह भावसिंगपुरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.