औरंगाबाद - सात महिन्यानंतर मराठवाड्यातील सर्वात मोठा व आर्थिक उलाढालीसाठी प्रचलित असलेला पाचोडचा आठवडी बाजार पुन्हा फुलला आहे. खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, ग्राहक आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
देशात कोरोना महामारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व अर्थचक्र ठप्प झाले होते. मात्र, आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून 'मिशन बिगीन अगेन' या मोहिमेअंतर्गत 15 ऑक्टोबरपासून राज्याच्या ग्रामीण भागातील छोटे-मोठे बाजार सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्व नियमाचे व मार्गदर्शक सूचनांचे कडेकोट पालन करण्याची अटही घातली आहे.
पैठण तालुक्यातील पाचोडचा आठवडी बाजार हा सात महिन्यानंतर आज फुलला. पाचोड परिसरातील 78 खेड्यांमधून शेतकरी आपला माल या बाजारात विक्रीसाठी आणतात. या गावांमध्ये पाचोड, मुरमा, कोळीबोडखा, केकत जळगाव, वडजी, थेरगाव, लिमगाव, कडेठाण, दादेगाव, हर्शी, आडगाव, अंतरवाली यांचा समावेश होतो. आज भरलेल्या बाजाराला 99 टक्के व्यापाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, आज पहिल्यांदाच बाजार भरल्याने ग्राहकांची संख्या काहीशी कमी होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात नक्कीच नागरिक माल खरेदी मोठ्या प्रमाणात येतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार सुरू झाले आहेत. आता सर्व काही सुरळीत होईल. ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. मात्र, येणाऱ्या सणांमुळे घरातील खरेदीसाठी नागरिक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. नागरिकांना जास्त दराने भाजीपाला किंवा अन्य पदार्थ खरेदी करावे लागत होते, ते आता स्वस्त दरात खरेदी करता येईल. याचा फायदा ग्राहक व व्यापारी दोघांनाही होणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी राजेंद्र ढोकळे यांनी दिली.