औरंगाबाद - आता शहर पोलीस दल 'ऑपरेशन मुस्कान 10' राबवत आहे. त्याअंतर्गत शहरात 0 ते 18 वयोगटातील हरवलेल्या, अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी (1 जून) काढले आहेत.
मुलांना पालकांच्या स्वाधीन करणार
'शहरात बेघर, आश्रय गृह, खासगी संस्था, रेल्वे-बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी, वस्तू विकणारी, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी काम करणारी मुले; अशा बालकांना हरवलेली मुले असे समजून त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात येणार आहे. शोध लागलेल्या बालकांना ताब्यात घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. ज्या बालकांच्या पालक सापडले नाहीत, अशा बालकांना बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे', असे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
पोलिसांचे आवाहन
'या मोहिमेसाठी पोलीस आयुक्तालय शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जापु पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक यासाठी नेमावे. शहरवासियांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा', असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले आहे.
हेही वाचा - पोलीस दलास मिळणार पोर्टेबल ऑफिस कॅबिन, रस्त्यावरील ड्युटी दरम्यान पडणार उपयोगी