औरंगाबाद - ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील जलसाठे कमी होत चालले आहेत. त्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर मराठवाड्याची जलसंजीवनी असणाऱ्या जायकवाडी धरणाने तळ गाठला असून धरणात फक्त उणे 9 टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.
जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाची 102 टीएमसी इतकी पाणी क्षमता आहे. मात्र, आज हे धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगरच्या शेतकऱ्यांवर पाणीसंकट आले असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणातील शिल्लक पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही. जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालन्यातील नागरिकांची तहान भागते, शिवाय दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना जायकवाडीतून पाणी दिले जाते. औरंगाबादसह जालना, बीड आणि अहमदनगरचे अनेक शेतकरी जयकवाडीच्या पाण्यावर शेती करतात. मात्र, आज जायकवाडीने तळ गाठल्याने अनेक गावांना टँकरचा आधार घ्यावा लागला आहे.
जयकवाडीच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाला तर जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.