औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गुरुवारी सकाळी 55 नवे रुग्ण आढळून आले. तसेच एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच समोर आले आहे.
गारखेडा हुसेन कॉलनी येथील 55 वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने 12 मे रोजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्रास होत असल्याने त्यांना घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची चाचणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना 14 मे रोजी सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपोथॉयरिजम हा त्रास होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.