औरंगाबाद: गंगापूर-वैजापूर मार्गावर मुद्देशवाडगाव पाटीजवळ कांदे घेऊन जाणारा पिकअप व ट्रकच्या अपघात झाला. मध्यरात्री हा अपघात झाला असून यात एक जण ठार तर, एक जण जखमी झाला आहे. अपघात झालेला ट्रक येवला येथून औरंगाबादकडे कांदे घेऊन जात होता.
मुद्देशवाडगाव पाटीजवळ पिकअप व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक सागर नारायण आहिरे (रा. ठाणगाव ता.येवला, नाशिक) यांचा मृत्यू झाला. ट्रक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समाजसेवक अनंता कुमावत यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे पाठवण्यात आले.
अपघातात पिकअपचा चुराडा -
अपघात इतका भीषण होता की यात पिकअपचा चुराडा झाला. पिकअप ड्रायव्हर गाडीत अडकल्याने क्रेनच्या सहाय्याने पिअकप बाजूला करून ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आले. पिकअपमध्ये कांदा असल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदे पसरले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. गंगापूर पोलिसानी क्रेनच्या मदतीने पिकअप बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. नितीन आहिरे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास गुसींगे करत आहे.