औरंगाबाद - ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. मात्र, त्यात आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनी सावधान राहण्याचा इशारा सायबर क्राईमच्या वतीने देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप अकाउंट होऊ शकते हॅक
आपल्या मोबाईलमध्ये असणारे व्हॉट्सअॅप सुरक्षित आहे. असे आपल्याला वाटत असेल, तर आपण चुकत आहात. कारण तुमचे व्हॉट्सअॅपसुद्धा हॅक होऊ शकते. औरंगाबादच्या सायबर पोलिसांकडे महिनाभरात तब्बल 20 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. औरंगाबादच्या एका तरुणाला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्याचा व्हॉट्सअॅप हॅक करून त्याच्या अनेक मित्रांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, त्याच्या काही मित्रांना तर अश्लील व्हिडिओ देखील पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कसे होत व्हॉट्सअॅप हॅक
हॅकर त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप डाऊनलोड करतो. त्यात तुमचा नंबर टाकतो आणि तुम्हाला फोन करून व्हॉट्सअॅप मधून बोलतो आहे, अशी बतावणी करतो. आपल्या बोलण्यातून विश्वास देत आलेला ओटीपी सांगा, असे तो सांगतो. त्याला सर्वसामान्य व्यक्ती विश्वास करत ओटीपी देतात. त्यानंतर आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होते आणि तुमचा व्हॉट्सअॅप हॅक करून फसवणूक करणारा ते वापरू लागतो. त्यातूनच तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पैशाची मागणी केली जाते. काही वेळेस लॉटरी लागण्याची लिंक पाठवून फसवले जाते, तर काहींना अश्लील मेसेज पाठवले जाते. आशा तक्रारीत वाढ झाल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बाळासाहेब थोरात यांंच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन
कॉल फॉरवर्ड करूनही व्हॉट्सअॅप होते हॅक
व्हॉट्सअॅपद्वारे फसवणूक करताना काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये ओटीपी नसेल, तर व्हॉट्सअॅप हॅक करण्यासाठी कॉल डायव्हर्टचा वापर केला जातो. यात फोन बंद करून ठेवलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. रात्री तुम्ही व्हॉट्सअॅप बंद केल्यावर हा फंडा वापरला जातो. डायव्हर्टचा पर्याय वापरत असताना, ऑनलाइन छेडछाड केली जाते. त्यामुळे, आपला मोबाईल बंद असला तर त्याचा डायव्हर्टचा वापर करत ओटीपी घेतला जातो आणि त्याचवेळी फसवणूक केली जाते. त्यामुळे, नागरिकांनी आपल्या मोबाईलचा वापर करताना सतर्क राहावे, असा इशारा औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप वापरताना नागरिकांनी घ्यावी काळजी
व्हॉट्सअॅप वापरताना नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला औरंगाबादच्या सायबर पोलिसांनी दिला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे फसवणूक करताना स्कॅनरने स्कॅन करून व्हॉट्सअॅप हॅक केले जाऊ शकते. त्यामुळे, अनोळखी माणसाच्या हातात मोबाईल देताना सावध रहा, असा पहिला इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे, आपल्याला कुठल्याही प्रकारचे ओटीपी किंवा इतर माहिती जर अज्ञात व्यक्तीने मागितली, तर माहिती देताना सतर्कता बाळगली पाहिजे, असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले. औरंगाबाद पोलिसांकडे गेल्या दोन महिन्यात व्हॉट्सअॅपद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा औरंगाबाद सायबर सेल पोलिसांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'संभाजीनगर'च्या मुद्यावरून राजकारण तापले