औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र बेजबाबदारपणे वावरत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी जिल्हा परिषदेच्या एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी काही विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. पोलिसांची परवानगी नसतानाही अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत जंगी सोहळा यावेळी करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोना बाबत नागरिकांना सल्ले करणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या आजाराबाबत मात्र गंभीर आहेत का? हा प्रश्न निर्माण होत आहे.
रमेश गायकवाड यांचा होता वाढदिवस -
जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जंगी नियोजन करण्यात आलं होते. मैदानावर मोठा मंडप लावून शेकडो गावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्यासह अनेक सदस्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमात झालेली मोठी गर्दी पाहता कोरोना नष्ट झालाय का? असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमात उपस्थित समर्थकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता आणि सॅनिटायझर व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाच्या आजाराला निमंत्रण देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
क्रेनने घातले हार, अनेकांवर गुन्हे दाखल...
जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वाळूज परिसरात जंगी तयारी करण्यात आली होती. जेसीबीच्या साह्याने मोठा हार लावण्यात आला होता. तो हार रमेश गायकवाड यांनी ओपन कारमधून स्वीकारला. जमलेली गर्दी पाहता पुढील काही दिवसात असलेला मोठा धोका स्पष्ट दिसून येत होते. पोलिसांच्या परवानगीविना केलेल्या या सोहळ्या विरोधात वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच शेख अख्तर, हारून चौधरी, मेहबूब चौधरी, महेंद्र खोतकर, के. व्ही. गायकवाड, गणेश आव्हाड, रुपाली राजीव शुक्ला, बाबाराम मिसाळ यांच्यासह मोहटादेवी मंदिर व भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव तसेच सदस्य, पंढरपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यांवर अशा अनेकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51, कलम 135, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 188, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.