छत्रपती संभाजीनगर: क्रांती चौकाजवळील समतानगरात शनी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. झुडुपाजवळ आलेल्या एका मुलीला हे बाळ दिसले. यानंतर तिने तिच्या आजीच्या मदतीने बाळाच्या तोंडातील बोळा काढून त्याचा श्वास मोकळा केला. या प्रकरणाची माहिती लागलीच क्रांतिचौक पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला महिला व बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले गेले.
महिला पोलिसाने दिली बाळाला ऊब: बाळाला तातडीने उपचाराची गरज होती. घाटी रुग्णालयात बाळाची तपासणी केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणले गेले. तिथे आल्यावर बाळाची अवस्था पाहून महिला पोलीस कर्मचारी रियाना शेख यांनी आपल्याकडील स्कॉर्फने बाळाला झाकले आणि मायेने जवळ घेतले. त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीकडे बाळाला सोपविण्यात आले. सध्या बाळ सुखरुप आहे. वेळेत पोलीस धावल्यामुळे बाळाला जीवदान मिळाले.
'या' पोलिसांमुळे वाचले बाळ: पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, पोलीस निरिक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे अंमलदार व्ही. एच अजाब, रेहाना शेख, एस. एस. ढोबाळ, योगेश ठाकूर यांच्या सहकार्याने डायल 112 च्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी वाचविले बाळाचे प्राण: अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात अर्भकास ( चिमुकल्या बाळास ) जन्म दिलेल्या नराधम आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयात फेकल्याची घटना 26 मार्च, 2022 रोजी पुण्यात समोर आली होती. सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे ही घडली आहे. या प्रकरणात त्या नराधम महिलेला अटक करण्यात आली आहे. परंतु देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे या घटनेची माहिती मिळताच देवदूताप्रमाणे सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने नवजात अर्भकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
हेही वाचा: