औरंगाबाद- आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आंबेडकरी आणि दलित लेखकांनी केले आहे. संविधान आणि देश टिकवण्यासाठी भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवायचे आहे. तसेच भाजप विरोधात आघाडीला मतदान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखकांची भेट घेणार असल्याची माहिती आंबेडकरी लेखकांनी दिली आहे.
राज्यात लोकसभेत एक प्रयोग झाला. मात्र त्याचा निकाल आपल्यासमोर आहे. केलेला प्रयोग योग्य रीतीने झाला नसल्याचा आरोप आंबेडकरी लेखक आणि कलावंतांनी केला आहे. औरंगाबादमधे आज लेखक आणि कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकरी कलावंत आणि लेखकांनी जाहीर केले आहे.
राज्यात सध्या विरोधक राहिला नाही. विरोधक संपला की हुकूमशाही सुरू होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम पक्ष नाही. आजपर्यंत मुस्लिम आणि दलित समाज हा अनेकांच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे. मात्र निवडणूक झाली की त्यांना महत्व दिले जात नाही. आज पैश्यावाल्याना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजासह, वंचित समाजाने आपले व्यक्ती स्वातंत्र्य बाधित ठेवण्यासाठी आघाडीला मतदान करवे, असे आवाहन लेखक आणि कलावंताकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- जायकवाडी धरणातून २००० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
सरकारने वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ असे म्हटले होते. उलट मिळालेल्या नोकऱ्या जात आहेत. आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच भीती दायक बोलले जाते. असे बोलून समाजात तेढ निर्माण करण्याच काम सरकार करत आहेत. सरकार लोकशाहीला संपवण्याच काम करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे योग्य विरोधक आघाडी असल्याने हा निर्णय घेतल्याचे उपस्थित लेखकांनी सांगितले.