औरंगाबाद - पंढरपूर येथे एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे रहस्य उलगडले असून नातेवाईकांना फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपीला वैजापूर येथून अटक करण्यात आली आहे. सचिन मधुकर पवार असे आरोपीचे नाव आहे.
औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावर एका 35 वर्षयी अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. आरोपीला पकडण्यात श्वान पथकातील 'स्वीटी'चा इशारा महत्वाचा ठरला आहे. घटनास्थळवरून स्वीटी बकवाल नगरकडे जाऊन थांबली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात खबऱ्यांशी संपर्क साधला असता सचिन पवार हा रात्रीपासून गायब असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या गावांची यादी तयार केली आणि वैजापूर व गंगापूर या दोन गावांमध्ये सापळा रचला. सचिन हा वैजापूर येथे नातेवाईकांकडे आला असता पोलिसांच्या तावडीत सापडला.
हेही वाचा - भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात पती-पत्नीवर अज्ञाताचा हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
पोलिसांनी वाळूज पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केल्यावर "मला नातेवाईकाला फोन करायचे होते. मी त्याला मोबाईल मागितला. त्याने नकार दिल्याने आमच्यात वाद झाला. मी त्याला मोकळ्या जागेत नेऊन त्याच्या डोक्यात दोन ते तीन वेळा दगड टाकला. दारूच्या नशेत मी ही हत्या केली", अशी कबुली आरोपी ने दिली आहे. मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. आरोपी आणि मृत व्यक्ती हे एकमेकांच्या ओळखीचे नव्हते. मृताच्या कपड्यांवर नाशिकच्या टेलरचे नाव आहे. त्यामुळे ही व्यक्ती नाशिकची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.