औरंगाबाद - पडेगाव येथील मिटमिटा तलावाजवळ एकाने पाठीवर थाप का मारली याचा जाब विचारल्याने, रागाच्या भरात चाकूने वार करून जाब विचारणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पडेगाव परिसरातील मिटमिटा तलावाजवळ शनिवारी लक्ष्मण चव्हाण, संजू काळे, क्रांती शिंदे, श्रीमंत काळे हे दारू पित होते, दरम्यान त्याचवेळेस येथून लक्ष्मण चव्हाण हा आपल्या घरी जात होता. यावेळी संजू काळे याने लक्ष्मणला पाठीवर थाप मारली. दरम्यान थाप का मारली याचा जाब विचारला असता. याचा राग आल्याने संजू काळे आणि लक्ष्मण यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी संजूने घरातून चाकू आणून लक्ष्मणवर वार केले. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या लक्ष्मणच्या भावावर देखील चाकूने वार करण्यात आले. घटनेत जखमी झालेल्या लक्ष्मणला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरोपीच्या पत्नीने दिली खोटी माहिती
दरम्यान जखमी लक्ष्मणाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर, आरोपी संजूच्या पत्नीने जखमी लक्ष्मणचे नाव लक्ष्मण बारकु काळे असल्याचे सांगितले. तसेच तो घरात टोकदार वस्तूवर पडल्याने जखमी झाल्याची माहिती देखील तीने दिली. तसेच यावेळी तिने स्वतःचे नाव सुध्दा पुजा यश काळे असे खोटे सांगीतले. याप्रकरणी मृत लक्ष्मनच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.