औरंगाबाद - मुंबईचे डबेवाले स्वीगी आणि झोमॅटोसारख्या खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत उतरणार आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात याबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी रितेश आंद्रे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये डबेवाले आपली सेवा देत आहेत. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तीन तासांमध्ये ग्राहकांपर्यंत अन्न पोहचवण्याचे काम यशस्वीरित्या सुरू आहे. इतर कंपन्यांसारखे कुठलेच आक्षेपार्ह प्रकार अद्याप डबेवाल्यांकडून घडलेले नाहीत. ग्राहकांचा डबेवाल्यांवर विश्वास आहे. हीच विश्वासहर्ता कायम ठेवत डबेवाले फूड सप्लाय करण्यासाठी आता उतरणार असल्याचे रितेश यांनी सांगितले. औरंगाबादच्या सीए असोसिएशनतर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी डबेवाले संघटनेचे पदाधिकारी औरंगाबादमध्ये आले होते.
हेही वाचा- हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार
मुंबईच्या डबेवाल्यांच्या वेळेचे नियोजन उत्तम आहे. जगात मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कामाचे आणि वेळेचे नियोजन जाणून घेण्यासाठी औरंगाबादमधील सीए असोसिएशनतर्फे डबेवाले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डबेवाल्यांकडून कामाचे नियोजन समजून घेण्यासाठी व्याख्यान ठेवले असल्याचे सीए असोसिएशनचे अध्यक्ष रोहन आचलीया यांनी सांगितले.