औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांनी शहागंज येथील बडी मस्जिद येथे नमाज पठण केलं. धार्मिक स्थळे आजपासून खुली झाल्यावर आठ महिन्यांनी जलील यांनी मशिदीत नमाज पठण केले. सरकारने धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी विलंब केला, त्यामुळे काय साध्य झालं, असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला.
मंदिर उघडताना अनेक नियम सरकारने केले आहेत. औरंगाबादहून दिल्लीला जाण्यासाठी तीन तास लागतात. त्यावेळी विमानात बाजूच्या खुर्चीवर इतर प्रवासी बसवले जातात. फक्त मास्क वापरा, असं सांगितलं जातं. त्यावेळी आपण जवळ बसल्याने कोरोना होत नाही का? धार्मिक स्थळांवर एकत्र आल्यावरच कोरोना होतो का? असा संतप्त सवाल एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विचारला.
व्यावसायिकांसाठी मंदिर उघडण्याची मागणी..
खासदार इम्तियाज जलील यांनी शहागंज येथील बडी मशिद येथे जाऊन नमाज पठण केलं. आठ महिन्यात सरकारने दिलेले नियम पाळून आम्ही धार्मिक विधी पार पाडले. पहिल्यांदाच ईदच्या वेळी आम्ही घरीच सण साजरा केला. धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी आम्ही करत होतो. हे काही भक्तांसाठी आमची मागणी नव्हती, तर मंदिर किंवा मस्जिद समोर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही मागणी होती. हातावर पोट असणाऱ्या या लोकांचा व्यवसाय बंद आहे म्हणून सरकारने काही आर्थिक मदत दिली नव्हती. त्यामुळे या लोकांसाठी आम्ही धार्मिक स्थळ उघडा, अशी मागणी केली होती. असं मत खासदार जलील यांनी व्यक्त केलं.