औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांना मस्जिदमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काहीवेळाने त्यांना नोटीस बजावत सोडून देण्यात आले. आज पुरते हे आंदोलन थांबले, तरी मात्र यापुढे आम्ही पुन्हा आंदोलन करू. मात्र, त्यावेळी आंदोलन वेगळ्या स्वरूपात असेल. आज आम्ही फक्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
पोलिसांच्या ताब्यातून सुटका होत असताना खासदार जलील यांनी हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी होते. आज जरी आम्ही आंदोलन थांबवले असले, तरी भविष्यात हे आंदोलन मोठ्या स्वरुपात उभे राहू शकते. धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी फक्त एमआयएमची नसून राज्यातील सर्वच नागरिकांची आहे. आज जरी औरंगाबादेत हे आंदोलन थांबले असले तरी राज्यातील इतर ठिकाणी हे आंदोलन सुरू होऊ शकते. त्यामुळे आता राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. आज आम्ही आंदोलन स्थगित केले असले तरी यापुढे कोणत्याही क्षणी आम्ही मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करु शकतो, इशारा खासदार यांच्या यांनी दिला.
तर खासदार जलील यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. हे आंदोलन आज पुरते थांबले आहे. पुन्हा जर अशाप्रकारे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही वेगळ्या स्वरुपाची कारवाई निश्चित करु, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. तर 1 सप्टेंबरला मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
हेही वाचा - माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन