औरंगाबाद - जिल्ह्यातील बाळापूर येते ३० वर्षीय मनोरुग्णाने डोक्यात कुऱ्हाड घालून ७५ वर्षीय आईचा खून केल्याची घटना घडली. शशिकलाबाई भिकाजी घुगे (७५), असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
संबंधित तरुण एका खासगी मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत आहे. तो विवाहित असून, त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. तसेच त्याला तीन भाऊ व तीन बहिणी आहेत. ते वेगवेगळे राहतात. बुधवारी सायंकाळी कुठल्यातरी वादावरून त्याने आई शशिकलाबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. त्यांच्या ओरडण्याने शेजारी धावले. त्यांनी त्याला पकडले. परंतु, तो त्यांना जुमानत नसल्याने त्याला दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याने झटका देत लोकांच्या तावडीतून स्वत:ला सोडवले आणि आईला दगड मारला. लोकांनी पुन्हा त्याला पकडले व दोरीने घट्ट बांधले. यानंतर चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक डॉ. विशाल नेहुल, चिकलठाणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.