छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): चिकलठाणा परिसरातील मेल्ट्रॉन रुग्णालय येथे महानगरपालिकेच्या वतीने कोविडसंबंधी यंत्रणा किती सज्ज आहे, याबाबत आढावा घेतला; मात्र लावलेली यंत्रणा जरी सज्ज असली तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे समोर आले. मेल्ट्रॉन रुग्णालयात सध्या 68 डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यात 12 डॉक्टर आणि 56 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी जाहिरात देखील काढण्यात आली; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी अचानक कोवीड रुग्णसंख्या वाढली तरी, पर्याप्त मनुष्यबळ उभे राहील असा विश्वास आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी व्यक्त केला.
पहिल्या लाटेतील कर्मचाऱ्यांना बोलवणार: मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना लाटेत आरोग्य यंत्रणा हादरली होती. त्यावेळी अनेक अनुभवी नसलेले आरोग्य कर्मचारी कामावर रुजू झाले आणि त्यांनी आपल्या परीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवीन लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे आश्वासन महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले. मेल्ट्रॉन येथील रुग्णालयात मॉक ड्रिल करत रुग्णसेवा किती सज्ज याबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी सध्या रुग्ण वाढत असले तरी चिंतेची बाब नाही; कारण बहुतांश रुग्णांना कमी लक्षण असून घरीच उपचार करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या अचानक वाढली तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत काम केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलवण्यात येईल. काही कर्मचारी संपर्कात असून ऐनवेळी गरज पडली तर मनुष्यबळ उभे राहील अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
लसींचा साठा संपला: कोरोनाला हरवण्यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी, आजाराला थांबण्यास लस प्रभावी ठरली आहे. मात्र शहरात लसींचा साठा पूर्ण संपल्याची बाब उघड झाली. 31 मार्चनंतर लस उपलब्ध नसल्याने अनेकांना ती देणे शक्य झाले नाही. मागील काही दिवसात लसीकरणाला मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे अडचण निर्माण झाली आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने तीस हजार लसींची मागणी केली असून लवकरच ती उपलब्ध होईल. त्यानंतर पहिल्या वेळेस ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच पद्धतीने लसीकरण मोहीम पुन्हा एकदा राबवली जाईल अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
हेही वाचा: Amritpal Singh : अमृतपालचा साथीदार पापलप्रीत याला दिल्लीतून अटक