औरंगाबाद - एका पित्याने पोटच्या मुलीला एका बाबाला दान केले ( Girl Donated On Bond Paper ) आहे. विशेष म्हणजे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वडिलांनी मुलगी बाबाच्या हवाली केल्याचे दानपत्र लिहून दिले आहे. हा प्रकार औरंगाबाद खंडपीठात उघड होताच न्यायाधीश कु. विभा कंकणवाडी यांनी या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले ( High Court Directed To Enquire Girl Donation ) असल्याची माहिती ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली.
अशी आहे घटना..
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील पोलीस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपी शंकेश्वर उर्फ शंभु ढाकणे आणि सोपान ढाकणे हे आरोपी आहेत. या दोघांच्या जमीन अर्जावर सुनावणी सुरू असताना, पीडित मुलीला तिच्या वडिलांनी एका बाबाला शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर दान दिल्याचं समोर आलं. 'मुलगी संपत्ती नाही, जी दान कराल' अशा कठोर शब्दात औरंगाबाद खंडपीठाने मुलीच्या वडिलांना फटकारले. तसेच जालना येथील बालकल्याण समितीला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
आरोप खोटे असल्याचा दावा..
ज्या बाबाला मुलगी दान दिली त्याच्या मठात अवैध धंदे सुरू असल्याबाबत तक्रार आल्याने ग्रामपंचायतीत बाबाला राहू देऊ नये असा ठराव आणण्यात आला होता. त्यामुळेच त्याच्यासोबत राहणाऱ्या या मुलीने खोटे आरोप केल्याचं याचिककर्त्यांचं म्हणणं आहे. त्याबाबत जमीनासाठी याचिककर्त्याने अर्ज केला होता, अशी माहिती ऍड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली.