छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची काय स्थिती आहे हे पहा, ते राजकारणात सक्रिय नाहीत. त्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात जे जे आहे त्यांची मूळ पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. अशा लोकांना महाराष्ट्रातील कुठलाही पक्ष घ्यायला तयार नाही; म्हणून ते तेलंगणाच्या पक्षात गेले, अशी टीका अतुल सावे यांनी केली. तर निवडणुकांचे वातावरण येत आहे. दरम्यान बरेच पक्ष महाराष्ट्रामध्ये येतील. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष असून हा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. तेलंगानासारखे 'केआरएस' येतील आणि जातील; परंतु त्याचा काही इथल्या जनतेवर परिणाम होणार नाही, अशी टीका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली.
विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही: नाना पटोले आणि शरद पवार यांचे वेगवेगळे 'स्टेटमेंट' येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे वेगळे 'स्टेटमेंट' आहे; मात्र त्यांच्या विचारांमध्ये समन्वय नाही. आरोप करणाऱ्यांनी आतापर्यंत काय केले याचे आधी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका अतुल सावे यांनी केली. इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने किती बैठका घेतल्या? किती निधी दिला? हे विरोधकांना माहीत नसल्याचे सावे म्हणाले.
मुंडेंना मदत करू: पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला आम्ही मदत करू. कारखाने अडचणीत असल्यामुळे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मदतीसाठी महाराष्ट्रातील नऊ कारखान्यांचे प्रस्ताव तयार झाले आहेत. NCDC पाठवले जातील आणि त्यांना अर्थसहाय्य अल्पव्याजाने दिले जाईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
भाजपने केले अभिवादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट भागात भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभाग घेतला.