औरंगाबाद - आज औरंगाबादहून दोन 'श्रमिक' रेल्वेमध्ये जवळपास 3 हजार 200 मजुरांना मध्य प्रदेशला पाठवण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास बलियासाठी एक रेल्वे रवाना करण्यात आली. तर एक रेल्वे गोरखपूरसाठी पाठवण्यात आली. तसेच आणखी 4 रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे देखील रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
आगामी 5 ते 6 दिवसांमध्ये औरंगाबादहून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागातील अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. ज्या मजुरांनी गावी जाण्यासाठी विनंती अर्ज केले आहेत, अशा मजुरांना तपासणी करून गावी जाण्यासाठी परवानगी दिली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि परिसरात जवळपास 6 हजार परप्रांतीय मजूर आपल्या घरी जाण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्यांना आपल्या गावी पाठवण्यासाठी नियोजन करण्याचे काम प्रशासन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात 2 रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जवळपास अडीच हजार मजुरांना आपल्या राज्यात पाठवण्यात आले. त्यानंतर बुधवारी 2 रेल्वेच्या माध्यमातून 3 हजार 200 हून अधिक मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले.
तर अनेक मजूर प्रतीक्षा यादीत असून या सर्व मजुरांना पाठवण्यासाठी लवकरच अतिरिक्त रेल्वे सोडण्यात येणार आहेत. प्रतीक्षा यादीनुसार मजुरांची यादी तयार करून रेल्वेत 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करून आसनव्यवस्था करून यांना पाठवण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यानंतर त्यांना सोडण्यात येत आहे, गरज पडेल तशी व्यवस्था मजुरांसाठी करण्यात येईल, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.