छत्रपती संभाजीनगर : पैठण रस्त्यावरील कांचनवाडी भागात मातोश्री वृद्धाश्रम निराधारांना आधार देण्याचे काम करते. यात 62 वृध्द मातांची आई होऊन काळजी घेतली जाते. तसे सर्वांचे वय साठ वर्ष वरील आहे. प्रत्येक आईची वेगळी कथा आहे. कौटुंबिक वाद त्यात जवळपास सारखाच. सुनेशी पटत नाही, त्यामुळे आपल्या मुलाचा संसार सुखाचा राहावा म्हणून त्या कुठलीही तक्रार न करता त्याग करून उरलेला आयुष्य वृद्धाश्रमात घालवण्यासाठी येतात. त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी मातोश्री वृद्धाश्रम नेहमीच नियोजन करते. वेळोवेळी त्यांच्या आरोग्य तपासणी करणे, त्यांच्या भोजनाची आणि औषधांची व्यवस्था देखील केली जाते. समाजात या अशा आईचं प्रमाण वाढत असल्याची खंत व्यवस्थापक पागोरे यांनी व्यक्त केली. आम्ही आलेल्या मातांना आधार देत असलो, तरी कुटुंबाची उणीव भरून काढू शकत नाही. त्यामुळे अनेक वेळा आम्ही समुपदेशन करण्याचा देखील प्रयत्न करत असतो. त्यात अनेक मातांना आम्हाला सांभाळण्याची वेळ येते. मात्र आम्ही आमचे कर्तव्य म्हणून आणि एक नाही तर अनेक आईंना संभाळण्याचा सौभाग्य आम्हाला प्राप्त झाले असं म्हणून आम्ही हे कार्य करतो, असं देखील सागर पागोरे यांनी सांगितलं.
गंगुबाई दहा वर्षांपासून राहतात एकट्या : बिडकीन येथे राहणाऱ्या गंगुबाई प्रभाकर अष्टीकर गेल्या दहा वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्य करतात. मुलगा आणि मुलगी दोघेही असताना त्यांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे. आधी त्या त्यांच्या लहान मुलाकडे राहत होत्या, मात्र व्यसनी झालेला मुलगा काही दिवसात जग सोडून गेला. त्यावेळी मोठ्या मुलाने आपली जबाबदारी झटकून टाकली. मुलगीही पाहायला आली नाही. अखेर त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. त्यांच्या नातवाचं लग्न काही दिवसांपूर्वी झालं. मात्र मुलाने आपल्या जन्मदात्या आईला त्या लग्नालाही बोलावलं नाही. काही दिवसांनी नातू आला आणि मी सांभाळायला तयार आहे, असं म्हणून घरी घेऊन गेला. मात्र एका महिन्यातच कुटुंबात झालेल्या वादामुळे पुन्हा त्या वृद्धाश्रमात परत आल्या. आता यापुढे कुटुंबाच्या कोणत्या सदस्याला भेटण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूनंतर मला अग्नीदेखील वृद्धाश्रमातील लोकांनी द्यावा, अशी अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याकडे बघून खरंच मुलगा आपल्या आई सोबत असं वागू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र या परिस्थितीतही आपल्या मुलाचं चांगलं व्हावं अशीच मनोकामना ह्या आईने व्यक्त केली.
एकुलत्या एक मुलीने सोडले : कन्नड तालुक्यातील मीरा मनोहर पगार या गेल्या काही वर्षांपासून वृद्धाश्रमात येऊन राहत आहेत. त्यांचे पती एका खाजगी कंपनीत कामावर होते. मात्र भावांसोबत असलेल्या वादातून विषारी औषध टाकून त्यांना मारण्यात आले. एकुलती एक मुलगी मात्र तिनेही आंतरजातीय विवाह करत पतीचा हात पकडून निघून गेली. काही दिवस आईला सोबत नेले. मात्र तिथे वर्तन इतके खराब झाले की शेवटी मीराबाई वृद्धाश्रमात येऊन राहू लागल्या. कुटुंबात आता कोणीही माझं नाही. त्यामुळे मी येथे आले मात्र नातेवाईक जे करू शकले नाही ते वृद्धाश्रमातील सदस्य करतात. त्यामुळे आता माझा अंत इथेच होईल तर मला आनंद असेल, अशी इच्छा मीराबाई यांनी व्यक्त केली.
सून आणि मुलासोबत होतात वाद : आई या शब्दात साक्षात देवाचं वास्तव्य असते. गृहिणी असो की बाहेरच्या धकाधकीच्या जीवनात काम करणारी आई असो, आपल्या मुलांना वाढवताना ती आयुष्य पणाला लावते. मुलं मोठी होतात त्यांचा संसार सुरू व्हावा म्हणून ती प्रयत्न करते आणि त्यांच लग्न लाऊन देते. मात्र त्यानंतर कौटुंबिक वाद तसे प्रत्येक घरात होत असतात. मात्र काही घरात आई नकोशी होते. सून आणि मुलगा यांच्याकडून मिळणारी वागणूक पाहता त्या वृद्धाश्रमाची वाट धरतात. आणि तिथेच असलेल्या लोकांमधे आपल कुटुंब शोधायला लागतात. ही कथा एका आईची नाही तर पैठण रस्त्यावर कांचन वाडी येथे असणाऱ्या मातोश्री सह इतर असणाऱ्या वृद्धाश्रम येथे राहणाऱ्या अनेक मातांची आहे.
1. हेही वाचा : Mothers Day : 'असा' साजरा करा मदर्स डे; आईला देऊ शकता 'हे' गिफ्ट्स
3. हेही वाचा : Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट येणार