औरंगाबाद - कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा दिली. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. मात्र, आता वैद्यकीय पदव्यूतर अभ्यासक्रमाची शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता निवासी डॉक्टराचा राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह संबंधित समस्यासाठी डॉक्टरांनी संप पुकारला.
१ ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप -
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह संबंधित समस्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी अद्यापही कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याने सरकार रास्त मागण्यांविषयी उदासीन असल्याची भावना राज्यभरातील निवासी डॉक्टर्सनी आंदोलन करून व्यक्त केला. राज्य शासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच निवासी डॉक्टरांच्या भावना लक्षात घेऊन सेंट्रल मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत शासनाला स्मरणपत्र देण्याचा व तत्काळ निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज संप पुकारून निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले.
हेही वाचा - निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर सचिवांच्या बैठकीतही तोडगा नाही; बेमुदत संप सुरुच
यावेळी निवासी डॉक्टरांना सुविधा द्याव्यात. तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावे, विमा पॉलिसी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अक्षय शिरसागर, उपाध्यक्ष डॉ. ऋषिकेश फडनिस, डॉ. योगिता देवरे, डॉ. सौरभ डिगोळे, डॉ. ऋषिकेश गव्हाणे सह आदींच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घाटी रुग्णालयांमध्ये रुग्णांना त्रास सहन करावा लागला. डॉक्टर रस्त्यावर असताना अनेक रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात आले होते. मात्र, डॉक्टरांचा संप असल्याने अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला.