औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 26 वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी उभारलेल्या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या अनुयायांना तब्बल 17 वर्षे लढा उभारावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
हेही वाचा - वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर यमराज सेल्फी काढेल
14 जानेवारीला मकरसंक्रातीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. तसेच मराठवाड्यासाठी हा दिवस मोठ्या लढ्याच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा लढा होता मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही काळ औरंगाबादेत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार उघडण्याची सुरुवात या निमित्ताने झाली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागायचे अन्ं ते प्रत्येकाला शक्य नव्हते.
हेही वाचा - नामविस्तार दिन : फक्त एका नावासाठी सलग १७ वर्षे चालेला हा लढा जगातील एकमेवाद्वितीय
मराठवाड्यात एक विद्यापीठ असावे, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली, त्यासाठी प्रयत्न केले. 1953 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. 1977 ते 1994 या काळात नामांतराचा लढा उभारला आणि 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. अखेर एका वेगळ्या लढ्याचा विजय झाला. त्याच दिवसाची आठवण म्हणून आजचा नामविस्ताराचा दिवस साजरा केला जातो. इतकेच नाही तर या लढ्यात बलिदान देणाऱ्यांना अभिवादन वाहण्यात येते.