औरंगाबाद - नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलने स्थगित करण्याचा निर्णय समितीच्यावतीने घेण्यात आला आहे. कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. तसेच कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर संमेलन घेण्याचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
नाशिकमध्ये धार्मिक किंवा सामाजिक सोहळ्याला परवानगी नाही -
राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मार्च अखेरीस होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसे होणार यावर चर्चा सुरू होत्या. दरम्यान, नाशिक शहरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक सोहळ्याला परवानगी नाही. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीदेखील लागू आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. त्यामुळे साहित्य संमेलन रद्द करण्यात आले आहे.
संमेलनाच्या प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याची होती मागणी -
सावरकर प्रेमींनी साहित्य संमलेनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले आणि अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना या मागणीचे निवेदनही दिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या भगूरचे पुत्र असल्याने संमेलनाच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच व्यासपीठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी आणि तिचे पूजन करण्यात यावे असही त्यांनी निवेदनात म्हटले होते.
सगळ्यांनी सबुरीने घेण्याचा भुजबळांचा सल्ला -
साहित्या संमेलनाला कोणाचे नाव द्यावे, कोणाचे नाही, यासाठी साहित्य संमेलनाची समिती आहे. ते योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम असून ते निर्णय घेतील असे नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले होते. तसेच सगळ्यांनी सबुरीने घेतले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. साहित्य संमेलन समितीला या सर्व गोष्टींची कल्पना असून ते योग्य ते निर्णय घेतील, असे भूजबळ यांनी म्हटले होते.
सर्वानुमते कवी कुसुमाग्रजांचं साहित्य संमेलनाला नाव देण्याचा निर्णय -
नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला कवीवर्य कुसुमाग्रजांचे नाव देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. साहित्य संमेलनाबाबत अनेकांच्या सूचना आल्या त्यामुळे विविध क्षेत्रातील सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. तसेच बैठकीत सर्वानुमते कवी कुसुमाग्रजांचे साहित्य संमेलनाला नाव देण्याचा निर्णय झाला असल्याचेही ते म्हणाले होते.
अण्णाभाऊ साठे यांच्याकडे साहित्य संमेलनाचे दुर्लक्ष -
यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होते. याला दलित महासंघाने विरोध केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी दलित महासंघाची होती. त्याचा ठराव या संमेलनात करावा, अशी मागणी यापूर्वीच त्यांनी केली होती. मात्र, याकडे मराठी साहित्य संमेलनात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दलित महासंघाने केला होता. त्या पार्श्वभूमीवर दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती.
निधीवरून झाला होता वाद -
नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनापूर्वी संमेलनाच्या निधीचा वाद चिघळला होता. एकीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हे संमेलन आपलेच असल्याने सर्व आमदार आणि नगरसेवकांनी आपला निधी संमेलनाला देण्याच्या सुचना केल्या होत्या. तर दुसरीकडे महापालिकेत सत्ताधारी भाजपाने मात्र तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देत एवढा निधी देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पालकमंत्री विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला होता.
अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची नेमणूक -
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली होती. शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चार तास बैठक चालली, त्यात नारळीकरांच्या नावावर एक मत झाले होते.
ऑनलाईन घेण्याची होती होती मागणी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ऑनलाईन घ्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. महामारीचे रुग्ण हे वाढू लागले आहे. यामुळे हे साहित्य संमेलन घेऊ नये, अशी मागणी वेगवेगळ्या समाज घटकांकडून होत होती. तर हे साहित्य संमेलन होणारच अशी भूमिका साहित्य संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ आणि काही शहरातील समाजिक संस्थांनी घेतली होती. या पार्श्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आप पार्टीचे जितेंद्र भावे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.