छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गावोगावी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांचा दौरा 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दर्शनानं होणार आहे. आमच्या नावानं कोणी पैसे मागितले, तर त्यांना देऊ नका असं जरांगे यांनी म्हटलंय.
असा असेल दौरा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी याआधी दोन टप्प्यात नागरिकांशी संवाद साधला होता. त्याचाच आता तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यात 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
15 नोव्हेंबर - वाशी, परांडा, करमाळा
16 नोव्हेंबर - दौंड, मायणी
17 नोव्हेंबर - सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
18 नोव्हेंबर - सातारा, मेंढा, रायगड
19 नोव्हेंबर - रायगड, पाचाड, मुळशी, आळंदी
20 नोव्हेंबर - सोलापूर, पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण
21 नोव्हेंबर - ठाणे, पालघर, नाशिक, त्रिंबकेश्वर
22 नोव्हेंबर - विश्रांतनगर, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर - नेवासा, शेवगाव, बोधेगाव, अंतरवाली अशा पद्धतीनं या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यापुढे आणखीन तीन टप्पे असून त्यात विदर्भ, मराठवाडा, कोकणाचा समावेश असेल, अशी माहिती जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समाजाच्या नावावर कोणीही पैसे देऊ नका : आमचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे होणार आहेत. समाज बांधवांशी भेटीगाठी घेणं, चर्चा करणं हा या दौऱ्यांचा मुख्य उद्देश आहे. मात्र, यासाठी आम्ही कुठलेही पैसे घेत नाही, तसंच कोणालाही पैसे मागत नाहीत. त्यामुळं जर कोणी आमच्या नावावर पैसे मागत असेल, तर ते देऊ नका, कोणी पैसे घेत असल्यास आम्हाला कल्पना द्या. हा लढा सामान्य माणसाचा आहे, त्यामुळं कोणालाही पैसे देऊ नये.
एकजूट राहा : महाराष्ट्रातील समाज बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी दौऱ्यावर जात आहे. आपल्याला 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार आहे. मात्र, समाजानं जागरुक राहायला हवं. एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात शांततेच्या मार्गानं आंदोलनाला सुरुवात करा. आता काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे. त्यामुळं आनंद व्यक्त होत आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नये. तुम्हाला शेवटचं, कळकळीचं आवाहन करतोय, आरक्षण मिळाल्यावर तुम्ही सगळे सोबत हवे आहात, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलंय.
हेही वाचा -
- Sanjay Raut On Eknath Shinde : 'कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी स्थिती'; मराठा विरुद्ध ओबीसी मंत्र्यांमधील वादावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
- Maratha Reservation : आरक्षण प्रश्नावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; 'जनगणना होईपर्यंत निवडणुका घेऊ नका'
- Tanaji Sawant On Maratha Reservation : दोन वर्षात कोणीच आंदोलन केलं नाही, आताच आंदोलन का - आरोग्य मंत्री तानाजी सावंत