छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange Patil News : "मी आलो तर तुमचा नाही तर समाजाचा", असा संदेश कुटुंबीयांना देऊन मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी कधीही संवाद साधलेला नाही. मात्र त्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान असून आरक्षण मिळाल्यावर आमच्याकडे वेळच वेळ असणार आहे. तेव्हा आम्ही निवांत गप्पा मारू असा विश्वास त्यांची पत्नी सुमित्रा आणि मुलगी पल्लवी यांनी व्यक्त केला.
उपोषण सुरू केल्यापासून कुटुंबाशी भेट नाही: गेल्या २२ वर्षांपासून मनोज जरांगे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून उपोषणाला बसले होते. आता समाजासाठी ते झटत असून २४ डिसेंबरपर्यंत नक्कीच आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केल्यापासून ते कुटुंबाला भेटले नाहीत. कुटुंबीयांनी अनेक वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ती भेट टाळली. अनेक वेळा त्यांच्याशी बोलावं वाटतं. मात्र आरक्षणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच आम्ही दिवाळीदेखील साजरी केली नाही. आता आरक्षण मिळाल्यावर आम्ही धडाकेबाज दिवाळी साजरी करू, असं मत जरांगे पाटील यांची पत्नी सुमित्रा यांनी व्यक्त केलं.
ओबीसी नेत्यांनी तसं बोलू नये: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण होतोय. मात्र, ओबीसी नेत्यांनी अशा पद्धतीनं टीका करू नये. त्यातून कोणाचचं भलं होणार नाहीय. ओबीसी नेते काही म्हणले तरी जरांगे पाटलांना फरक पडत नाही. ओबीसी समाजालाही मराठ्यांना आरक्षण मिळावं असंच वाटतं. ओबीसी नेत्यांच्या वक्तवांबद्दल लोकांना काही देणंघेणं नाही. ओबीसी आणि मराठा हे सख्ख्या भावाप्रमाणे राहतात, असं मतदेखील सुमित्रा जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
पप्पांनी काळजी वाटते: पप्पांची काळजी वाटते, असं मत जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी हिनं व्यक्त केलं. ते घराबाहेर पडले तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं. मी बाहेर असताना फक्त समाजाचा आहे. तुमचा नाही. त्यामुळे त्यांच्याशी संपर्कदेखील होत नाही. ते दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस त्यांची काळजी वाटत असते. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं. पण त्यांनी आराम केला तर समाजाचं वाटोळं होईल. समाज बिथरेल म्हणून ते शांत बसू शकत नाही. त्यामुळे ते बाहेर आहेत. याबद्दल काहीही वाटत नाही. लवकरच त्यांची भेट होईल, असा विश्वासही मुलगी पल्लवीनं व्यक्त केला.
हेही वाचा: