छत्रपती संभाजीनगर (गंगापूर) : Maratha Protest: मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकार कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याची भावना झाल्याने 'मराठा क्रांती मोर्चा' आक्रमक झाला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा शासन निर्णय न दिल्यास 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन' (Marathwada Mukti Sangram Day) 'काळा दिवस' म्हणून साजरा करणार. तसेच 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना'ला जिल्ह्यात ग्रामपंचायतपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज फडकू न देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय. छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावर ईसरवाडी फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महामार्ग अडवण्यात (Maratha Protest over Maratha Reservation) आला होता. मराठा आरक्षणासंदर्भात जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आमरण उपोषण तर अनेक ठिकाणी बंद पुकारला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको : मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत, असा 'मराठा क्रांती मोर्चा'चा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावर इसरवाडी फाटा (Isarwadi Fata) येथे, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकासह मराठा बांधवांनी सोमवारी सकाळी महामार्ग अडवला होता. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अर्धा तास चाललेल्या 'रास्ता रोको' आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर 'मराठा क्रांती मोर्चा'च्या वतीने तहसीलदार सतीश सोनी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं.
आंदोलकाच्या मागण्या : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत असलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या अमानुषपणे मारहाणीत अनेक आंदोलक जखमी झाले. त्याचा गंगापूर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तसेच, आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याऐवजी तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचंच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढून निर्णय घेण्यात यावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
देविदास पाठे यांचं आमरण उपोषण : सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण सांगून समाजाची फसवणूक करू नये. मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगाव आंदोलनासह, आंतरवली सराटी आणि राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत. हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू कायगाव गंगापूर येथे देविदास पाठे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आठ दिवस आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांनी रुग्णालयातही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. देविदास पाठे यांना काही झालं तर सकल मराठा समाज व महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत.
मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती : यावेळी 'मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक ज्ञानेश्वर निळ, योगेश शेळके, भाऊसाहेब शेळके, शांतीलाल साळवे, गणेश राऊत राहुल ढोले, उद्धव काळे, विश्वजित चव्हाण, किशोर परभणे, विशाल पवार, विक्रम राऊत, कारभारी दूबीले, रावसाहेब टेके, विठ्ठल कूंजर, किरण वालतुरे, नारायण शेळके, नितीन शेळके, किशोर राऊत, विठ्ठल टेके, धनंजय ढोले, संतोष खवले, उद्धव खोमणे, यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी वाळूज पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा -
Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, तोडगा निघणार?