छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange on Reservation : आरक्षण भेटलं तर मी राजीनामा देईल, असं म्हणणारे लोक पदाला चिटकून बसून गरळ ओकतात. त्यांनी राजीनामा दिला किंवा नाही त्याचा आम्हाला काय फायदा? अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता केली. आम्हाला आमचं आरक्षण द्या. इतकंच बस, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
त्या लोकांना आवरा : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मनोज जरांगे पाटील यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय. त्यावर जरांगे पाटील यांनी टीका केलीय. आम्हाला आमचं हक्काचं ओबीसीमधून आरक्षण द्या. तुम्हाला आरक्षण टिकवण्याची गरज पडणार नाही. आम्ही सबुरीनं घेत आहोत. तुमच्या लोकांना आवरा. खूप फडफड करत आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय. अजित पवार हे छगन भुजबळ यांना भेटले नाहीत असं कळलं. मात्र त्याबाबत मला माहिती नाही. त्यांनी बघितलं नाही किंवा बघण्यासारखं काही राहिलं नाही, याबाबत मी बोलणार नाही, अशी मिश्किल टीका जरांगे पाटीलांनी केलीय.
लोकांच्या प्रेमामुळं जंगी स्वागत : एक डिसेंबर रोजी जालन्यात जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. इतकंच नाही तर जेसीबीद्वारे फुलंही उधळण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. मात्र, त्यावर अनेक लोक टीका करतात. या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील यांनी टीकाकारांना उत्तर दिलंय. मागील 70 वर्षांपासून आरक्षणाची वाट पाहतोय. आरक्षण भेटण्याची आशा मावळली असताना आता नव्यानं ऊर्जा निर्माण झालीय. राज्यात 32 लाख लोकांना नव्यानं आरक्षण मिळालंय. त्यामुळं आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कोणी काहीही म्हणाले तरी आनंद व्यक्त करत आहेत. समाजासाठी मी काम करतोय. त्यामुळं ते आपला मुलगा म्हणून स्वागत करत आहेत. मी त्यांना असं करू नका याबाबत वारंवार सांगितलं. मात्र ते ऐकत नाही. त्याला मी काही करु शकत नाही. मात्र काही लोक टीका करतात. यांनी समाजाच किंवा कोणाचं भलं केलं नाही. यांचा सत्कार कोण करणार अशी टीका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.
रुग्णालयातून मिळाली सुट्टी : उपचार घेतल्यानंतर आता रुग्णालयातून सुट्टी मिळालीय. आता अंतरवाली सराटी इथं आंदोलन ठिकाणी मी जाणार आहे. एक डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यातील दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं. गर्दीत फिरल्यानं, अनेक ठिकाणी जागरण झाल्यामुळं थकवा आला होता. मात्र, आता डॉक्टरांनी मला बरं केलंय. त्यामुळं आता चांगलं वाटतय, समाजात पुन्हा जाणार असून त्यांना आपले विचार सांगण्यासाठी किंवा जागृती करण्यासाठी मी फिरणार आहे. समाज एक होतोय आहे याचा आनंद मला वाटतो, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय.
हेही वाचा :