औरंगाबाद- लासूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेसमोर उडी घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रतापचंद मिटुराम सिंग (वय.३८, रा. सलेट गोदम, जि. धर्मशाळा, हिमाचल प्रदेश) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दागिन्यांसाठी विविध प्रकारच्या पर्स, पिशव्या तयार करण्याचा प्रतापचंद यांचा व्यवसाय होता. त्याची ऑर्डर घेण्यासाठी ते विविध शहरांमध्ये जात होते. त्या कामानिमित्त ते काही दिवसांपूर्वी औरंगाबादला आले होते. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांनी लासूर रेल्वेस्टेशन येथे रेल्वेसमोर उडी मारली होती. संतोष सोमानी यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांना घाटी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, ८ नोव्हेंबर रेाजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. जखमी असताना प्रतापचंद यांनी रेल्वे पोलिसांना त्यांच्या गावाची माहिती दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी धर्मशाळा पोलिसांशी संपर्क साधला. तेथील पोलिसांना प्रतापचंद यांचे नाव व छायाचित्र पाठवून त्यांची ओळख पटवली.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. रविवारी प्रतापचंद यांच्या नातेवाईकांनी शहरात येऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे. या घटनेची रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार चंद्रविजय प्रधान पुढील तपास करत आहेत.