औरंगाबाद - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यांनतर आता येथील महानगर पालिकेत देखील हाच फार्म्युला वापरला जाणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला आहे. लवकरच वरिष्ठ पातळीवर घोषणा केली जाईल, अशी माहिती माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर शिवसेनेने सरकार स्थापन केले. यानंतर पुन्हा शिवसेना औरंगाबाद महानगर पालिका ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचा फार्म्युला महानगर पालिका निवडणुकीत वापरण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे, याबाबत अधिकृत घोषणा वरिष्ठ पातळीवर करण्यात येईल. तसेच महानगर पालिकेत असलेल्या पक्षीय बलाबल नुसार जागावाटप केले जाईल, असेही खैरे म्हणाले.
हेही वाचा - 'आधी शहराचे प्रश्न सोडवा, नंतर आम्ही स्वतः नाव बदलाय मदत करू'
राज्यात नव्या समीकरणामुळे सत्ता परिवर्तन झाले आहे. यानंतर आता महानगर पालिकेतही सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे भाजपला सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोठा जोर लावावा लागणार आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेने गेल्या 25 वर्षांची असलेली मैत्री तोडली. यानंतर आता ज्या औरंगाबाद महानगर पालिकेत युती अस्तित्वात आली त्याठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आहे तर भाजप मात्र सध्या तरी एकटाच निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे.