औरंगाबाद : भगवान शंकराची देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यात प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे वैशिष्ठ पाहायला मिळते. सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर होय. पाहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. तर घृष्णेश्वर मंदिराचे पूर्वाभिमुख आहे. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारे घृष्णेश्वर भगवान असे मानले जाते. देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो. तर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होत आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करत असतात. राज्यभर महाशिवरात्रीचा जल्लोष पहायला मिळत आहे.
मध्यरात्रीपासून भाविकांची गर्दी : महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. रात्री बारा वाजता भगवान शंकराची आरती करून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते. दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता शासकीय पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवले जाते. स्थानिक ग्रामस्थांनी गैरसोय होऊ नये याकरिता त्यांच्यासाठी विशेष वेळ निर्धारित करून दिली जाते. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था, उपवास असल्याने पाणी आणि फराळाची सोय केली जाते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. तर वाहनांना मंदिर परिसरात येण्यास मनाई असून त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात येतात.
लाल रंगाच्या दगडातील बांधकाम : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे वैशिष्ठ आहेत. मंदिराचे बांधकाम लाल दगडात करण्यात आले असून त्यावरील नक्षीकाम सर्वांना आकर्षित करते. मंदिरात प्रवेश केल्यावर वेगळाच अनुभव मिळतो. असलेल्या नोंदीनुसार वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेले हे पवित्र धार्मिकस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी 16 शतकात मंदिराचे प्रथम जीर्णोद्धार केले होते. त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी 1730 मधे मंदिराचे बांधकाम केले. जे आजही तसेच असून त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केल्याची इतिहासात नोंद आहे.
हेही वाचा : Mahashivratri : आज महाशिवरात्री! 27 वर्षांनंतर येणार 'असा' अद्भुत योगायोग, जाणून घ्या सविस्तर