औरंगाबाद - आमच्याकडे खुप पैसे असून तुम्हाला दुप्पट पैसे देतो असे सांगून व्यापाऱ्याची १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील दोन जणांना ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. अटकेत असलेल्या दोघाकडून पोलिसांनी रोख रक्कम, पाच मोबाईल असा एकूण ३ लाख २४ हजार ४५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक मागवत फुंदे यांनी शनिवारी (दि. १९) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार -
शेख हारुण शेख छोटु (वय ३८, रा.दुखीनगर, जुना जालना), अस्लम इब्राहीम कुरेशी (४६, रा. आनंदनगर, नूतन वसाहत, जालना) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. शेख मिकन शेख मिट्टू (रा. बोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) व त्याचा एक साथीदार फरार आहे.
'दहा लाख रुपये द्या, तुम्हाला २० लाख रूपये देतो' -
फुलंब्री तालुक्यातील पाल येथील व्यापारी राजू बाबूलाल शिंदे (वय ४२) यांच्या दुकानावर महिनाभरापूर्वी काळे पाटील व सुनील नावाचे दोन जण आले होते. त्यावेळी दोघांनी आम्ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून आलो असून आमच्याकडे खुप पैसे पडलेले आहेत. तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला २० लाख रूपये देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ३ जूनला काळे पाटील व सुनील यांनी राजू शिंदे यांना तुम्ही दहा लाख रुपये घेवून मोकरदन रोडने सिल्लोड येथे या असे सांगितले. राजू शिंदे हे दहा लाख रुपये घेवून गेले असता तेथे असलेल्या दोन जणांनी शिंदे यांच्याजवळील दहा लाख रूपयांची बॅग घेवून पोबारा केला होता. त्यावेळी शिंदे यांना मिळालेली बॅग त्यांनी तपासली असता त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरदाची कारवाई यांनी केली -
ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, जमादार नामदेव सिरसाठ, संजय काळे, प्रमोद खांदेमराड, विक्रम देशमुख, बालू पाथ्रीकर, किरण गोरे, वाल्मीक निकम, राहुल पगारे, शेख नदीम, संजय मोसले, ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, संजय तांदळे, संतोष डमाळे आदींच्या पथकाने तांत्रीक तपास करून शेख हारुण शेख छोटु व अस्लम इब्राहीम कुरेशी यांना गजाआड केले.