औरंगाबाद : शेतात उभ्या पिकांवर पडणारी कीड शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या मदतीला आता "खेत ज्योतिष"( Khet Jyotish Aap ) येणार आहे. हा ज्योतिषी तुम्हाला तुमच्या पिकांचं भवितव्य सांगून त्यावर उपाय सुचवणार आहे. त्यामुळे पिकांचं होणार नुकसान टाळता येणार असल्याचा दावा केला जात आहे.
दोन भावंडांनी केले संशोधन : समीर पितळे ( Sameer Pitale App Creator ) आणि प्रतीक पितळे ( Pratik Pitale App Creator ) हे बंधू नेहमीच विविध विविध विषयावर संशोधन करीत असतात. सन २०१८मध्ये ‘स्टार्टअप इंडिया चॅलेंज’मध्ये ‘पोस्ट हार्वेस्ट लॉसेस’ कमी कसे करावे यासाठी स्पर्धा झाली होती. त्यात त्यांना शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान हे पिकावरील रोगामुळे होते ही बाब लक्षात घेत "खेत ज्योतिष" या संकल्पनेवर काम सुरू केले. बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या पिकावर कोणती औषध फवारणी करावी याबाबत संभ्रम अवस्था असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होते. जर पिकावर पडणारे रोग जर आधीच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना अगोदरच कळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार ( crop diseases Loss farmers ) नाही. त्यामुळे त्यांनी सन २०१८ ला उपकरण बनविण्याचे ठरविले होते. आता हे उपकरण बनविण्यात बंधूना यश आले. चाचणीसाठी एका शेतात हा ज्योतिष बसवण्यात आला असून त्यांनी तयार केलेल्या ॲपवर पिकांच्या अवस्थेबद्दल माहिती अद्यावत होत असल्याचे पितळे बंधूंनी सांगितले.
त्यामुळे दिले "खेत ज्योतिष" नाव : ज्योतिषी म्हणलं की एखाद्याची कुंडली पाहून त्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी सांगून त्यावर उपाय सुचवतो असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्याच पद्धतीने तयार करण्यात आलेले यंत्र. शेतातील पिकांची असणारी अवस्था आणि त्यावर उपाय सुचवणार आहे. त्यामुळे या यंत्राला "खेत ज्योतिष" नाव दिल्याची माहिती पितळे बंधूंनी दिली.
असे करतो "खेत ज्योतिष" काम : ग्रामीण भागात अनेकवेळा विजेची समस्या असते त्यामुळे उपकरणाला डेटा गोळा करताना कुठलेही खंड पडू नये, नेहमी अद्यावत माहिती मिळावी या करिता हे उपकारण सौरऊर्जेवर काम करेल याची काळजी घेण्यात आली. शिवाय इंटरनेटशी जोडलेले सिम कार्ड त्यात जोडण्यात आले आहे. शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा आणि वेग, सूर्यप्रकाश, पाऊस, धुके, दवबिंदू आदी माहिती एका ठिकाणी जमा करते. याच माहितीच्या आधारावर कोणता रोग पिकावर पडणार आहे. याबाबत माहिती देतो. त्या आधारावर योग्य वेळेवर कीटकनाशक फवारणी करणे शक्य होईल. परिणामी पिकांचे नुकसान टाळता येईल असे मत पितळे बंधूंनी व्यक्त केले.
फळ बागांवर पहिला प्रयोग : पिकांवर पडणारा रोग त्यामुळे शेतकरी त्रस्त असतो. विशेषतः फळ बागांवर होणारा परिणाम अधिक नुकसान करणारा असतो. त्यामुळेच "खेत ज्योतिष" तयार झाल्यानंतर माळीवाडा येथील एका शेतात प्रायोगिक तत्वावर यंत्र बसवण्यात आले आहे. चार वर्ष मेहनत घेतल्यावर ही यंत्रणा तयार झाली असून त्यासाठी जवळपास दोन लाखांचा खर्च झाला आहे. त्यातील काही पार्ट पितळे बंधूंनी स्वतः तयार केले असून त्यांचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना मदत करेल असा विश्वास पितळे बंधूंनी व्यक्त केला.