औरंगाबाद- मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी येथे कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी हर्सूलच्या हरीसिद्धी माता मंदिराच्या कुंडातून पाणी कावडमधे घेऊन खडकेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
2018 मध्ये काढण्यात आलेल्या कावड यात्रेची नोंद गिनीज बुकात झाली होती. 501 फुटांची भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. अशा प्रकारची मोठी यात्रा म्हणून हा बहुमान कवाड यात्रेला मिळाला होता. यावर्षी देखील 502 फूट लांब अशी यात्रा काढल्याचे आयोजक आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी सांगितले. राज्यात सर्वत्र पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दुष्काळाचे चित्र आहे. देवाची अराधना आणि पूजन करुन मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हर्सूल येथून कावड यात्रेचे आयोजन केले जाते. सकाळी 9 च्या सुमारास यात्रा सुरू झाली. हजारो नागरिकांनी पावसासाठी साकडे घालत पाण्याने भरलेल्या तांब्याची कावड खांद्यावर घेत, देवाचा जयघोष करत यात्रेत सहभाग घेतला. शहराचे दैवत असलेल्या खडकेश्वरच्या महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीला कावडमधून आणलेल्या पाण्याचा अभिषेक घातला. या यात्रेसाठी जवळपास 501 फुट लांब कावड तयार करण्यात आली होती. ही यात्रा कुठल्या एका जाती धर्माची किंवा पक्षाची नसून पावसासाठी नागरिकांनी काढलेली यात्रा असल्याच आयोजकांनी सांगितले.