कन्नड (औरंगाबाद) - दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष दाखवुन लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड शहर पोलीस स्टेशन यांनी पर्दाफाश केला आहे. भानुदास काशिनाथ मगर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, की दिनांक ०६ ऑगस्टला भानुदास काशिनाथ मगर (वय ३८ वर्ष, हिवरखेडा, ता. कन्नड) येथील रहिवासी असून शेती करतात. ते अद्रकचे व्यापारी असून त्यांची बहिरगांव (ता.कन्नड) येथील अद्रकचे व्यापारी संदीप पवार व त्यांच्या आई सोबत ओळख आहे. सुमारे दहा बारा दिवसांपूर्वी त्यांना संदीप पवारच्या आईने सांगितले की, एक पार्टी आहे. तुम्ही एक लाख रुपये दिले तर ते त्याचे दुप्पट पैसे करून देतात असे सांगून त्यांना पैसे दुप्पट करणाऱ्या महाराजांचा मोबाईल नंबर दिला, त्यानंतर त्यांनी पैसे जमा करणे चालू केले.
दिनांक ०५ ऑगस्टला पवार बाई यांनी महाराजांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांचे बोलणे करुन दिले, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की, संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान साठे चौक कन्नड येथे येण्यास सांगितले, त्यावरुन ते संध्याकाळी साडेसात वाजता मोटार सायकलवरुन साठे चौक कन्नड येथे गेले असता तेथे त्यांना पैसे दुप्पट करुन देणारे महाराज एका अनोळखी व्यक्तीसह भेटले. तेथून त्यांना मोटार सायकलवर बसवुन ते घरी घेऊन गेले तेथे पैसे दुप्पट करुन देणाऱ्या महाराजाने हळद कुंकू व एक मीटर कोरा कपडा घेण्यास सांगितले. त्यावरुन त्यांना कोरा कपडा दिला असता त्या कपड्यावरुन हळद कुंकू टाका व पेमेंट सोबत घ्या, असे सांगितल्याने त्यावरुन त्यांनी त्याच्या जवळील ४,००,००० रुपये रोख रक्कम एका बॅग मध्ये टाकून महाराज व त्यांच्या सोबतच्या व्यक्तीसह मोटार सायकलवर बसून पिशोर नाका येथे आले. तेथे ते मोबाईलवर बोलत असताना महाराज व त्याच्या सोबतच्या व्यक्तीने पैसे घेऊन पिशोर नाका येथून इनोव्हा गाडीने पिशोरकडे पोबारा केला.
पोलिसांनी रक्कम व गुन्ह्यात वापरलेली इनेव्हा कार असा एकुण ११,१८,०००/- रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयांतील इतर आरोपींचा शोध घेणे चालू असून आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे कन्नड शहर यांचे ताब्यात देण्यात आले असुन अशाच प्रकारे औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात गुन्हे केलेले असुन त्यांचेकडून इतर जिल्ह्तील आणखी
अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी कन्नड जगदीश सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत कुंदे, रामेश्वर रेंगे, सहा. पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस उप निरिक्षक, भगतसिंग दुलत, पोह संजय काळे, विक्रम देशमुख, पोना/शेख नदीम, विनोद तांगडे, गणेश चेळेकर, योगेश तरमाळे, पोकॉ गणेश गोरक्ष यांनी केली आहे.