औरंगाबाद - पाटबंधारे विभागाने कन्नड शहराचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. त्यामुळे नगराध्यक्षांनी नगरसेवक आणि नागरिकांसह पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयाबाहेर उपोषण केले. चर्चेनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने हे उपोषण सोडण्यात आले.
कै. अप्पासाहेब नागदकर या प्रकल्पातून कन्नड शहराला पाणी पुरवठा केला जातो. कोणतीही पूर्वसुचना न देता आडमूठे धोरण स्वीकारून पाटबंधारे विभागाने 6 मार्चला संध्याकाळी पाणीपुरवठा अचानक बंद केला. जलशुद्धीकरण केंद्रावर येणारे पाणी बंद झाल्याने याबाबत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रकल्पावर जाऊन चौकशी केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपअभियंता भावठाणकर, शाखा अभियंता जारवाल यांनी नगर परिषदेचा व्हॉल्व सील केल्याचे सांगितले.
हेही वाचा - मनसेकडून औरंगाबाद पालिकेच्या 'भोंगळ कारभाराची होळी'
नगर परिषदेला कुठलीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी पाणीपुरवठा बंद केला. नगर परिषदेकडे व्याज आणि दंड आकारून 84 लाख 80 हजार 728 रुपये जास्तीची थकबाकी दाखवली आहे. नगर परिषदेने यावर आक्षेप घेऊन व्याज आणि दंड वगळून देयके देण्याची तयारी दर्शवली होती. परिषदेने पाच लाख रुपयांचा धनादेश देखील संबंधित विभागास देऊ केला होता. मात्र, त्यांनी तो घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाकडेच नगर परिषदेची 11 लाख 6 हजार 361 रुपये थकबाकी आहे.
दरम्यान, पाणी पुरवठा खंडीत झाल्याने शहरातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याबाबद नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपअभियंता पाटबंधारे विभाग, पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन उपोषण केले.
नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, गटनेते संतोष कोल्हे, नगरसेवक युवराज बनकर, पाणी पुरवठा सभापती कविता पंडित, कैलास जाधव यांच्यासह बंटी काशीनंद, भानुदास शिंदे, रवी राठोड, उद्धव पवार, रत्नाकर पंडित, अस्लम पटेल, काकासाहेब ठोकळ, अनिल कोल्हे आदींसह नागरिकांनी या उपोषणात सहभाग घेतला होता. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास पाटबंधारे विभागाने शहराचा पाणीवरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले.