छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायततीवर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुळे या बीआरएसच्या पहिल्या सरपंच असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.
बीआरएसच्या पहिल्या सरपंच : सुषमा विष्णू मुळे यांची सरपंच पदी निवड झाल्यामुळे बीआरएस पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये एन्ट्री झाली आहे. बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली सावखेडा ग्रामपंचायत येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे यांची सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे सुषमा विष्णू मुळे यांच्या रूपाने भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्र राज्याच्या प्रथम सरपंच मिळाल्या.
राज्यातील राजकारणात प्रवेश : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने राज्यातील राजकारणात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम सुरू केले आहे. भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रशेखरराव हेही आघाडीवर होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखरराव यांनी त्यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी त्यांनी सभा घेण्याचे सत्र चालू केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सभेला प्रतिसादही मिळत आहे. बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरू करण्यात आलेल्या योजना. तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखर राव हे सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. गंगापूर खुलताबाद मतदारसंघात बीआरएस पक्षांमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार का हे पाहावे लागेल.
हेही वाचा -