छत्रपती संभाजीनगर Jarange CM : काही वर्षांपूर्वी अभिनेता अनिल कपूरचा नायक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात मुख्यमंत्री झाल्यावर अनिल कपूरनं एका दिवसात सर्वसामान्यांना न्याय दिल्याचं दाखवण्यात आलं. तसंच काहीसं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे करु शकतात अशी भावना सर्वसामान्य आंदोलनकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी जरांगे यांना एक महिना मुख्यमंत्री करा अशी मागणी करण्यात आलीय. शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलंय. विशाल नांदरकर असं या कार्यकर्त्यांचं नाव असून मराठा नाही तर सर्व समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
बाँडवर सादर केलं प्रतिज्ञापत्र : गेल्या काही वर्षांमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. समाजाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यावर अनेक समाज बांधवांना आरक्षण मिळेल असा विश्वास निर्माण झालाय. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असं आंदोलकांना वाटत आहे. सरकार आश्वासन देत असलं तरी आरक्षण मिळेल असं वाटत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर विशाल नांदरकर यांनी शपथपत्र सादर केलंय. यात आरक्षणाचा मुद्दा फक्त जरांगे पाटील मार्गी लावू शकतात त्यामुळं त्यांना एका महिन्याचा मुख्यमंत्री करा अशी अजब मागणी केलीय.
दोन मुख्यमंत्री करा : राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत, जर दोन जण उपमुख्यमंत्री पदी राहू शकतात तर मुख्यमंत्री पदावर दोन जण का राहू शकत नाही? असा प्रश्न आंदोलक विशाल नांदरकर यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर सर्व पक्ष अडचणीत येतील असं वाटत असेल तर त्यांनी त्यांना एका महिन्यासाठी फक्त आरक्षणाच्या मुद्द्यासाठीच त्यांना मुख्यमंत्री करावं, इतर कारभार हा एकनाथ शिंदे यांनी पाहावा. मात्र मराठा नाही तर, इतर समाजांचे आरक्षणाचे प्रश्न मनोज जरांगे पाटील हेच मार्गी लावू शकतात. त्यामुळं त्यांना एक महिन्यासाठी मुख्यमंत्रीपद द्यावं म्हणजे सर्व प्रश्न सुटतील अशी मागणी देखील करण्यात आलीय.
प्रकाश आंबेडकर मदत करतील : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे कोणाचाही सल्ला ऐकत नाहीत. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला ते ऐकतात. त्यामुळं मुख्यमंत्री झाल्यावर कायदेशीर येणाऱ्या अडचणी सोडवण्यात प्रकाश आंबेडकर हे मदत करतील असं देखील या निवेदनात आंदोलक विशाल नांदरकर यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर हे कायदेतज्ञ आहेत. कायद्याची बाजू ते चांगल्या प्रकारे मांडू शकतात. त्यामुळं आरक्षणाच्या बाबतीत येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मनोज जरांगे यांना ते मदत करू शकतात. त्यामुळं सर्व समाजाच्या आरक्षणाबाबतीत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही असंही निवेदनात म्हटलंय.
हेही वाचा :